बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ आयोजित बाबा वर्दम स्मृती नाट्यस्पर्धा – २०२० च्या पाचव्या दिवशी (बुधवार) सांगलीचे इरफान मुजावर लिखित व प्रताप सोनाळे दिग्दर्शित ‘पूर्णविराम’ नाटक सादर झाले. हे नाटक अनामिक नातेसंबंधांवर भाष्य करते.
या नाटकात लेखकाने भारतीय संस्कृतीच्या समाज चौकटीतील काही अमान्य नात्यांची बाजू उलगडून दाखविली आहे. मुळात नाती ही फार किचकट असतात. ती समजावून देणं हे तर त्याहूनही अधिक कठीण आणि त्यात जर त्या नात्याला नाव नसेल, तर गोष्ट आणखीनच कठीण बनते. हीच कठीण गोष्ट दिग्दर्शक प्रताप सोनाळे यांनी फार सोपी करून मांडली आहे.