केदार सामंत : ९८२२३०९८८७, ८२७५३९०९०९

अवघी २५००० लोकवस्ती असलेले कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ हे गाव. पूर्वीची हौशी नाट्यमंडळे कुडाळमध्ये स्थापन होत असत. प्रयोगही होत असत. परंतु ती नाट्यमंडळे तात्पुरत्या कालावधीसाठी असत. दरवर्षी नित्यनेमाने नाट्यकलाकृती सादर करून सतत १२ वर्षे मनोरंजन व समाजसेवा साधणारी कुडाळमधील 'बाबा वर्दम थिएटर्स' हि पहिलीच हौशी नाट्यसंस्था. छोट्याश्या कुडाळनगरीत १२ वर्षांपूर्वी कै.बाबा वर्दम, कै.वामनराव पाटणकर व शंकरभाई वर्दम आदी नाट्यप्रेमी मंडळींनी चंदू शिरसाटच्या नेतृत्वाखाली या संघाचे इवलेसे रोपटे लावले. १२ वर्षात कोकण, सांगली, गोवा, बेळगाव व कऱ्हाड येथील नाट्यरसिकांच्या प्रेमाने सदाबहार पालवी त्या रोपट्याला फुटली.

पुण्या-मुंबई पासून फार दूर असलेल्या, नाट्य निर्मितीची साधने व साहित्य दुर्मीळ असलेल्या कुडाळ सारख्या शहरवजा खेड्यात एप्रिल १९७२ मध्ये कुडाळमधील या तरुणांनी 'कलोपासक मंडळ' या नावाने दत्ता पावसकर लिखित "उंबरठ्यावरी माप ठेविले" हा कुडाळकर रसिक प्रेक्षकांची मने हेलावून सोडणारा अतिशय सुंदर प्रयोग सादर करून नाट्य निर्मिती सुरु केली. १९७४ मध्ये सांगली येथील राज्य नाट्यस्पर्धेत 'एका घरात होती' हे सुरेख खरे लिखित नाटक मोठ्या ताकदीने पेश केले गेले. कुडाळमधील लोकप्रिय डॉक्टर शशिकांत शिरसाट (सध्या वास्तव्य फोंडा गोवा,) यांनी या नाटकाचे प्रयोग दक्षिण कोकणात होण्यास सर्वतोपरी साह्य केले. या नाटकाने कुडाळ, कणकवली, सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ला येथील नाट्यरसिकांची मने जिंकून घेतली. या नाट्यप्रयोगाने संघाला विद्या वेतुरेकर हा तांत्रिक अंगे कुशलतेने सांभाळणारा, कुशल कार्यवाह व संयोजक मिळवून दिला आणि हीच या नाटकाची सर्वात मोठी जमेची बाजू ठरली.

२ एप्रिल १९७५ ला या नाट्यसंघाचे प्रेरणास्थान व हितचिंतक, चित्रपट-रंगभूमीवरील सुप्रसिद्ध रंगभूषाकार श्री. बाबा वर्दम यांचे दुःखद देहावसन झाले आणि २/३ वर्षे या संघाची नाट्यनिर्मिती काहीशी मंदावली. परंतु १९७८ मध्ये नाट्यकला जोपासण्याची प्रेरणा देणाऱ्या कै. बाबा वर्दम यांचेच नाव धारण करून या संघाने नाट्यनिर्मिती सुरु केली. तेव्हापासून रंगदेवतेच्या आणि सर्व थोर कलाकारांच्या तसेच आदरणीय श्री. एकनाथजी ठाकूर साहेब यांच्या आशिर्वादाने बाबा वर्दम थिएटर्स हा हौशी नाट्यसंघ कल्पक व प्रतिभावंत दिग्दर्शक चंदू शिरसाट व संस्थेचे माजी अध्यक्ष प्रकाश पाटणकर आणि संस्थेचे अध्यक्ष, जेष्ठ रंगभूषाकार श्री. विलास कुडाळकर यांच्या नेतृत्वाखाली गेली ४७ वर्षे कोकणची रंगभूमी आपल्या नवनवीन, कल्पक व देखण्या नाट्य कलाकृतींनी गाजवत आहे.

१९७८ मध्ये नाट्य निर्मितीला सुरुवात झाल्यापासून एकाहून एक सरस नाटके तसेच नवनवीन एकांकिकांचे प्रयोग सिंधुदुर्ग, बेळगाव, कराड, सांगली, मुंबई, गोवा या ठिकाणी गाजू लागले. त्यापैकी कळकीच बाळं, देवनवरी, मैत या तीन एकांकिकांनी तर इतिहास घडविला. वर्षा सामंत-वैद्य, प्रकाश पाटणकर, प्रसाद रेगे, कमलाकर इन्सुलकर, प्रफुल्ल वालावलकर, आनंद वैद्य, नंदू पाटील, छोटू पडते, डॉ. गुरुराज कुलकर्णी, रविंद्र ठाकूर, संजय पुनाळेकर, हेमंत देशपांडे, निलेश जोशी, विजय कुडाळकर, महेंद्र गवस, प्रसाद कुंटे, मंदार कुंटे, शमा वैद्य, विशाखा वैद्य, तन्वी मुंडले, पुजा गाळवणकर, मेधा मणेरीकर, पद्मा वेंगुर्लेकर, स्वप्नील गावकर, गुरुप्रसाद शिरसाट यासारखे गुणी कलावंत, मनोहर ओटवणेकर, अशोक कुडाळकर, अमित देसाई, राजन नाईक, मनोज कुडाळकर, निलेश परब, अनिल आचरेकर, विश्वजीत पालव, यासारखे कुशल तंत्रज्ञ, सुरेश राऊळ, बाळकृष्ण नाईक, शाम तेंडोलकर यासारखे उत्तम संगीतकार, विद्या वेतुरेकर, कै. राजन ओटवणेकर, उदय वेलणकर यासारखे कुशल व्यवस्थापक या सर्वांना घेऊन चंदू शिरसाट या प्रतिभावंत दिग्दर्शकाने बाबा वर्दम थिएटर्सचे नांव सर्वतोपरी केले आहे.  कणकवली, बेळगांव, कराड, इचलकरंजी, पाली, वेंगुर्ला इ. ठिकाणच्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा तसेच राज्य नाट्य स्पर्धेत बाबा वर्दम थिएटर्सने आजपर्यंत अनेक प्रथम क्रमांकाची व वैयक्तिक पारितोषिके मिळविली आहेत.

१९८२ साली मैत, १९८३ साली कळकीचं बाळं, १९८४ साली देवनवरी या तीन एकांकिकांनी बॅ. नाथ पै एकांकिका स्पर्धा, कणकवली येथे प्रथम क्रमांक मिळवून सतत तीन वर्षे प्रथम क्रमांक मिळविण्याची हॅटट्रीक साधली. एकाच वर्षी एकाच मोसमात कणकवली, बेळगाव व कराड येथील तीन वेगवेगळ्या राज्य पातळीवरील एकांकिका स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून एक वेगळीच हॅट्‌ट्रीक साधली. दिग्दर्शक चंदू शिरसाट यांनी कणकवली स्पर्धेत सतत तीन वर्षे दिग्दर्शनाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक घेऊन हॅट्‌ट्रीक नोंदवत एकूण पाचवेळा प्रथम क्रमांक पटकावणारा एकमेव दिग्दर्शक हा विक्रम केला. वर्षा सामंत-वैद्य ही अभिनेत्री कणकवली येथील स्पर्धेत तीन वेळा स्त्री-अभिनयाचे प्रथम पारितोषिक मिळविणारी एकमेव अभिनेत्री ठरली आहे.

महाराष्ट्र शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या नाट्यस्पर्धेत बाबा वर्दम थिएटर्सने संगीत साईकथामृत-द्वितीय (१९९४), दुभंग- द्वितीय (२०११), संगीत लग्नकल्लोळ- तृतीय (२०१२), सारे प्रवासी घडीचे- द्वितीय (२०१३) अशी पारितोषिक मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. तसेच सन २००५ साली प्रसिध्द दिग्दर्शक, अभिनेते श्री. अमोल पालेकर यांनी आयोजित केलेल्या सुप्रसिध्द नाटककार कै. विजय तेंडुलकर यांच्या एकांकिकांचा महोत्सव म्हणजेच "तें महोत्सव" मध्ये बाबा वर्दम थिएटर्स ला 'काही खरं नव्हे !' ही एकांकिका सादर करण्याचा मान मिळाला.

आतापर्यंत केवळ नाट्य निर्मितीचा आनंद घेणाऱ्या बाबा वर्दम थिएटर्सने याहीपुढे एक पाऊल टाकत २००० सालापासून आंतरराज्य नाट्य स्पर्धा आयोजित करण्यास सुरुवात केली. आपल्या नेटक्या व दिमाखदार आयोजनाने महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक येथील रंगकर्मीच्या मनात ही स्पर्धा घर करुन बसली. गेल्या बारा वर्षात या स्पर्धेत भरतनाट्य मंदिर पुणे, इप्टा-पुणे, प्रत्यय-कोल्हापूर, देवल क्लब कोल्हापूर, नाट्यआराधना- सोलापूर, देवल स्मारक मंदिर- सांगली, कलापीनी-तळेगाव-दाभाडे, रुद्रेश्वर- पणजी, फुलोरा-बेळगाव, इंद्रधनू-जळगाव, नगर अर्बन बँक-अहमदनगर, समर्थ रंगभूमी-रत्नागिरी, श्रीरंग-रत्नागिरी, ॲक्टीव्ह थिएटर्स-पुणे, स्नेह-पुणे, पी.डी.ए.- पुणे, अभिनय-कल्याण, ब्राह्मणसभा-मुंबई यासारख्या नामवंत नाट्यसंघ सहभागी झाले आहेत.  सदर स्पर्धेस सर्वश्री कमलाकर नाडकर्णी, शफाअत खान, दिलीप जगताप, धनंजय गोळे, बाळासाहेब दैनी, तुषार भद्रे, प्रसाद वनारसे, विलास गुप्ते, भास्कर जाधव, नंदू पाटील, शाम नाडकर्णी, रविंद्र पाथरे, आशालताबाई वाबगांवकर, संजय क्षेमकल्याणी, विलास गुर्जर, प्र.ल. मयेकर, श्रीराम खाडीलकर, कृष्णा बोरकर, डॉ. राजेंद्र चव्हाण, सुनिल गुरव, प्रदीप कुलकर्णी, गंगाराम गवाणकर यासारखे नाट्यक्षेत्रातील दिग्गज परीक्षक म्हणून लाभले आहेत.

नाट्यनिर्मिती, नाट्यस्पर्धा आयोजन या बरोबरच बाबा वर्दम थिएटर्सने तीनवेळा नाट्य प्रशिक्षण शिबीरे आयोजित करुन सिंधुदुर्गातील नव तरुण कलाकारांना नाट्यक्षेत्रातील तज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळवून दिला. या शिबीरात जेष्ठ अभिनेते मा. श्री. विक्रमजी गोखले, प्रसिध्द दिग्दर्शक राजीव शिंदे, तुषार भद्रे, डॉ. शरद भुताडिया, अभय जोग, बाळासाहेब दैनी, विलास गुर्जर, रंगभूषाकार सर्वश्री कृष्णा बोरकर, विलास कुडाळकर, रमेश वर्दम, पंढरीनाथ जुकर त्याचप्रमाणे ज्येष्ठ नृत्यांगना श्रीम. मंजिरी देव यांनी येऊन शिबीरार्थींना मार्गदर्शन केले.

सन २०१३ पासून संस्थेने कुडाळ येथील नामवंत शैक्षणिक संस्था, कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ यांचे सहयोगाने, कुडाळचे सुपुत्र तथा ज्येष्ठ साहित्यिक चिं.त्र्यं. खानोलकर तथा आरती प्रभू यांच्या नावे नाटकार व कवी यांच्यासाठी 'आरती प्रभू पुरस्कार' सुरु केला आहे. बाबा वर्दम थिएटर्सचा हा चढता आलेख पाहून पुण्यातील प्रसिध्द रंगभूषाकार श्री. प्रभाकर भावे यांनी कृतज्ञता पुरस्कार देऊन त्यांना गौरविले आहे. अशाप्रकारे गेली ४७ वर्षे नाट्यनिर्मिती, नाट्यस्पर्धा आयोजन, नाट्यशिबीर याद्वारे बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ सिंधुदुर्गातील नाट्य चळवळीचे एक प्रमुख केंद्र बनले आहे.

Close Menu